परिचय


शेतकरी हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा आहे. शेतकरी सामूहीक पद्धतीने एकत्र यावा त्याने योग्य पीक पद्धतींचा अवलंब करून प्रगतीशील, उद्यमशील व्हावे या उद्देशाने महाराष्ट्रचं नव्हे तर देशभरातील विविध भागातील प्रगतिशील शेतकरी एकत्र येऊन 'ही मैत्री विचारांची' या नावाच्या समूहाची सुरुवात झाली.


समूहाच्या माध्यमातून शेतकरी व्हॉट्सऍपच्या वापरून शेती विषयक माहितीची देवाण घेवाण करत होते. पिकांचे फोटो, कापणी, मळणी, तोडणी, ई. चे फोटो व व्हिडिओ शेयर करत होते. सर्व सुरळीत होते पण काही मर्यादा देखील होत्या. सर्वच प्रश्नांची उत्तर देणे देखील शक्य नव्हते. सर्वांशी एकत्रित सुसंवाद साधता येत नव्हता या समस्येवर तोडगा शोधण्याची मोहीम हातात घेण्यात आली आणि ८ ऑगस्ट २०२१ रोजी ‘क्लबहाऊस’ या सोशल मीडियाच्या ऑडिओ ॲपवर ‘ही मैत्री विचारांची’ या नावाचा समूह सुरू करण्यात आला आणि अशा प्रकारे डिजिटल चावडीची सुरुवात होऊन देशभरातील बांधावरचा शेतकरी देखील सर्वांशी जोडला गेला.



आज या समूहाच्या माध्यमातून क्लबहाऊस ऑडिओ ॲपवर २४ तास चर्चा होते. समूहाचे सभासद एकत्र येऊन आपल्या पिकांबद्दल माहिती, खत वापराची पद्धत, हवामान अंदाज, शेती उत्पादनाचे बाजार मुल्य, भविष्यात करावयाची लागवड, ई. विषयांवर चर्चा करतात. बऱ्याचदा शेतकऱ्यांकडे विजेची रात्रीची सोय असते असे शेतकरी 'ही मैत्री विचारांची' या समूहावर येवून गप्पा गोष्टी करत पिकाला पाणी देतात. समूहाचे शेतकरी प्रत्यक्ष एकत्र येऊन कृषीप्रदर्शन किंवा विविध पीक शेतीला भेटी सुद्धा देतात. समूहाच्या माध्यमातून विविध शेती विषयक चर्चा सत्र व मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले जातात. शेतकऱ्यांनी मागणी किंवा सूचना केल्याप्रमाणे त्यांना गरज असलेल्या विषयांवर कृषीविभाग, कृषीविद्यापीठ, पिक तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्या मार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.



आमच्या समूहात फक्त पुरुषच नाही, तर शेतकरी महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग आहे. नवरात्रीनिमित्त जागर स्त्रीशक्तीचा उत्सव शेतीतील नवदुर्गेचा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. यात महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतीत नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा जीवन प्रवास कथन आयोजित केला जातो. विशेष करून अश्या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन संपूर्णपणे शेतकरी महिलांच्या हाती दिलं जात. यांचा मूळ उद्देश शेतकरी महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देवून इतर शेतकरी महिलांना प्रोत्साहन देणं हा आहे.



खराब वातावरण, अवकाळी पाऊस, बर्फवृष्टि, दुष्काळ किंवा अस्थिर बाजार भावामुळे डोक्यावर झालेले कर्ज अशा संकटाचा शेतकरी कायम सामना करत असतो आणि तो हताश होऊन शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या सारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचतो. या बिकट परिस्थितीत ‘ही मैत्री विचारांची’ या समूहाचे शेतकरी एकत्र येऊन अश्या शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या समस्या जाणून घेवून आणि पर्यायाने त्यांचे निराकरण करून त्यांना पुनः खंबीरपणे उभे राहण्याची ताकद देतात. मग ते नवीन बीज, खते उपलब्ध करून देणे असो किंवा मनुष्यबळ पुरवणे असो जितकं शक्य होईल तितकी मदत करून हा समूह अश्या शेतकऱ्यांच्या कुटुंबावर येणारं संकट पेलवून घेण्यासाठी सदैव तत्पर असतो. अश्या कित्येक घटना या समूहातील शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे टाळल्या गेल्याची उदाहरणे आहेत.



कोणत्याही राजकीय विचारधारेशी संलग्न नसणारा आणि शेती व शेतकरी हीच धर्म व जात मानून एकोप्याने काम करणारा असा एक आगळा-वेगळा शेतकरी समूह आहे. आजतागायत ‘ही मैत्री विचारांची’ या समूहामध्ये ४,००० पेक्षा अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. आज महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यातील शेतकरी सुद्धा सहभागी आहेत. भविष्यात हजारो शेतकऱ्यांना जोडून त्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी ‘ही मैत्री विचारांची’ हा समूह कार्यरत असणार आहे.



बदलत्या काळानुसार प्रत्येक समस्येवर मात देऊन हजारो शेतकऱ्यांना दिशा दाखवण्याचे काम आमचा समूह अविरतपणे करत आहे आणि शेतकऱ्यांच्या भविष्यातील गरजा ओळखून नाविन्यपूर्ण काम करण्याचा आमचा सदैव प्रयत्न असणार आहे.



- ही मैत्री विचारांची फाऊंडेशन

© 2025 HMV Foundation. All Rights Reserved.